Sharvari patankar biography definition
लेखनाची सुरुवात कधी झाली? शर्वरी पाटणकर म्हणते
महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 3 Aug , pm
Subscribe
लहानपणापासून मातब्बर लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळेच शर्वरी पाटणकर या क्षेत्राचा जवळून अनुभव घेऊ शकली. लहान वयात रंगभूमीवर झालेलं शिक्षण, जाणकार मंडळींचे संस्कार यातूनच तिच्यात अभिनय आणि लेखनाचे गुण आपसूक भिनले.
शर्वरी पाटणकर
माझ्या लेखनाची सुरुवात कधी झाली याचा विचार करायला लागल्यावर मला नेमकं आठवेचना. पण डोळ्यांसमोर अनेक नावं आणि चेहरे यायला लागले. लहानपणी विजयाबाई मेहता, गुरु पार्वतीकुमार, पंडित सत्यदेव दुबे, चेतन दातार, प्रतिमा कुलकर्णी, सुलभा देशपांडे, मधल्या काळात अमोल पालेकर, प्रिया तेंडुलकर, विक्रम गोखले, अगदी आता आता मानव कौल या अशा मातब्बर, अतिशय गुणवान कलाप्रेमींबरोबर काम करण्याची संधी मिळाली. मागे वळून बघताना लक्षात आलं की लहान वयात कळत नकळत रंगभूमीवर झालेलं शिक्षण, वर उल्लेख केलेल्या सर्व व्यक्तींचे माझ्यावर झालेले संस्कार यातूनच अंगात अभिनय आणि लेखनाचे गुण आपसूक भिनले असावेत.
पाचवीत असताना केलेलं 'दुर्गा झाली गौरी' हे नृत्यनाट्य त्यावेळी तोंडपाठ होतं. 'झोपेला औषध कुठलं ग बाई, झोपेला औषध मेहनत गं बाई. कष्टाचं खाईल त्याची झोप कशी जाईल? आणि हरामाचं खाईल त्याला झोप कशी येईल?' इतक्या सहजसुंदर सोप्या शब्दातला भावार्थ किती सुंदर आहे हे मला थोडं मोठं झाल्यावर कळलं आणि माधव साखरदांडे यांच्या तरल लेखणीची कमाल वाटली. विजयाबाई मेहता यांच्या 'हयवदन' या गिरीश कर्नाड लिखित नाटकात काम करताना त्यांची सुंदर भाषा आणि भाव त्या ८-९ वर्षांच्या लहान वयात एंट्रीची वाट बघत विंगेत बसलेली असताना सतत कानावर पडत होता, 'धर्मपुरीतील दोघे युवजन सखेसोबती ऐसे, तनमन त्यांचे एकच केवळ, अतूट पाणी जैसे' हे ३५ वर्षांपूर्वी ऐकलेलं आजही सहज तोंडातून बाहेर येतं. तीच गोष्ट दुबेजींबरोबर केलेल्या चेतन दातारच्या 'सावल्या' या नाटकाची, जे नाटक लेखकांच्या प्रयोगशाळेतून तावून सुलाखून बाहेर पडलेलं होतं. यातले संवाद, व्यक्तिरेखा, त्यांच्या लकबी, त्यांचे स्वभाव याबद्दल चेतनकडून खूप ऐकायला मिळालं. सत्यदेव दुबे कलाकाराला एखाद्या सीनमध्ये त्या पात्राचा वावर कसा असला पाहिजे हे समजावत तेव्हा आपसूक 'लिखाणात काय असतं आणि सादर करताना त्यातून काय बाहेर काढायचं असतं' हे कळू लागलं. 'प्रपंच' या मालिकेत काम करताना प्रतिमाताईंच्या लिखाणाचं प्रचंड कौतुक झालेलं मी बघितलं होतं. नेमकं काय वैशिष्ट्य होतं त्यांच्या लिखाणाचं? तसं पाहिलं तर सोपे बोली भाषेतले संवाद; पण त्यातला गर्भितार्थ किती मोठा असायचा. उदाहरणार्थ, लग्न झाल्यानंतर लतिका अलकाला सांगते 'तू लग्न करशील तेव्हा त्या मुलाचं दिसणं, त्याचा पगार, शिक्षण हे बघू नकोस. तो आपल्या अण्णांसमोर कसा बसतो, टॅक्सीवाल्याशी कसा बोलतो, वेटरशी कसा वागतो ते बघ.' नशिबाने अतिशय चांगली भाषा माझ्या सतत कानावर पडत राहिली आणि बोलायला मिळाली. बालमोहन शाळेमुळे मराठीबाबत बऱ्यापैकी आत्मविश्वास होता. बहुधा हीच ती शिदोरी आहे ज्या जोरावर मी लेखन करायला सुरुवात केली असावी.
मालिकेचं संवादलेखन मी सुरु केलं ते सोहा कुलकर्णीमुळे. पहिल्या फटक्यात मी तिला हो म्हटलं नाही, पण नाहीसुद्धा म्हटलं नाही. स्वतःच्या समाधानासाठी मी तिला एक ट्रायल एपिसोड दिला. त्या बेसिसवर दशमी क्रिएशनच्या नितीन वैद्यांनी 'बे दुणे पाच' या मालिकेचं संवादलेखन मला दिलं. मी स्वतः अभिनेत्री असल्याचा फायदा मला संवाद लिहिताना आणि सीन फुलवताना नक्कीच झाला. त्यानंतर, 'असावा सुंदर स्वप्नांचा बंगला', 'तुमचं आमचं सेम असतं', 'खुलता कळी खुलेना', 'तुला पाहते रे' आणि आता 'रंग माझा वेगळा' अशा मालिकांचं संवादलेखन मी सातत्यानं करतेय. 'तुला पाहते रे' या मालिकेनं टीआरपीचे उच्चांक गाठले; पण माझ्यासाठी ही मालिका अभिजित गुरु आणि शेखर ढवळीकर या दोन सिद्धहस्त लेखकांमुळे महत्त्वाची ठरली. शेखरकडून संवादलेखनाची काही तंत्र शिकता आली. आपल्या आजूबाजूच्या मंडळींकडून गोष्टी टिपत रहाणं आणि त्यातून आपलं काम समृद्ध करत जाणं या प्रक्रियेवर माझा पूर्ण विश्वास आहे. मला एखादं लिखाणाचं तंत्र वापरून सीन कदाचित लिहिता येणार नाही पण ते तंत्र समजून घेतलं की योग्य वेळी ते आपोआप लिखाणात उतरेल हा विश्वास मला असतो.
'प्रपंच'च्या सेटवर प्रतिमाताईंना सीन्स लिहिताना मी जवळून पाहिलं आहे. त्या एकीकडे आमचं सेटवर सतत निरीक्षण करीत. आम्ही आमच्या व्यक्तिरेखांमध्ये आपली स्वतःची अशी काय भर टाकतोय ते बघून ती विशिष्ट लकब त्या पुढे आपल्या लेखनात समाविष्ट करत. आता संवादलेखन करताना एपिसोड बघत मी ही खुबी जरूर वापरते. 'मी एक सीन लिहू का' असं त्यांना मी त्यावेळी विचारलं तेव्हा त्यांनी त्या सीनमध्ये अण्णा आणि नंदू कशाबद्दल बोलणार आहेत ते थोडक्यात सांगितलं. मी सकाळी शूटिंगला जाताना सीन लिहून घेऊन गेले. प्रतिमाताईंनी तो वापरलासुद्धा. हा जो विश्वास आणि प्रोत्साहन मला मिळालं तिथेच माझ्या लेखनप्रवासाची बीजं रुजली. आपल्या आजूबाजूची माणसं घडवण्याचं काम या ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तींनी केलं नसतं तर माझ्यासारखीला संवादलेखनाचा आत्मविश्वास आला नसता.
लिखित संहिता नसताना केवळ दिग्दर्शनातून उभं राहिलेलं 'लाल पेन्सिल' हे मानव कौलचं हिंदी नाटक लेखन आणि दिग्दर्शनाला वेगळं करणारी रेषा पुसून टाकणारं होतं. नाटक उभं करताना त्याचे संवाद लिहिले गेले. लिखाणाची ही उलटी प्रक्रिया मी जवळून पाहिली. जाहिरातीत काम करताना हे लोक कमीत कमी शब्द कसे काय निवडत असतील हे कुतूहल वाटत राहिलं. या अशा अनुभवांमुळे कलाकार म्हणून कक्षा रुंदावत गेल्या आणि मी आपल्या कामाकडे अधिक मोकळ्या आणि व्यापक दृष्टिकोनातून बघू लागले.
इतके वर्षं मनात आस होती ती स्वतःचं काहीतरी निर्माण करण्याची. 'क्वेस्ट' या शैक्षणिक ट्रस्टसाठी मी लहान मुलांची 'मुळ्याची भाजी' ही माझी पहिली वहिली गोष्ट लिहिली होती. आताच एका ऑडिओ बुक अॅपसाठी मी लहान मुलांच्या तीन गोष्टींची एक सीरिज लिहिली आहे. त्यात सल्लुभाय कुत्रा, मंदिरा मांजर, छोका मोका कावळ्यांचं एक कुटुंब या मी जन्म दिलेल्या व्यक्तिरेखा आहेत. स्वतः काल्पनिक व्यक्तिरेखांचं एक जग तयार करणं, त्यांना रूप, रंग, आकार, स्वभाव देणं, त्यांच्यात भावबंध निर्माण करून एक मनोरंजक कथा रचणं यातली नशा काही वेगळीच आहे. लेखिका म्हणून माझा प्रवास आत्ताशी कुठे सुरु झालाय. आता तो मला पुढे कुठे नेतोय आणि मला काय नवीन सापडतंय याची मलासुद्धा उत्सुकता आहे.